23 डिसेंबरलाच होणार विकास कामांचा शुभारंभ- महापौर
औरंगाबाद- शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची राज्यात आणि
केंद्रात युती असली तरी त्यांच्यातील अंतर्गत धुसफूस ही वेळोवेळी चव्हाट्यावर आली
आहे. मनपात ही दोघांमधील मतभेद वारंवार चर्चेत राहिले आहेत. या महिन्यात शहरातील
विविध विकास कामांचा शुभारंभ केला जाणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सेनेचे
युवा नेते अदित्य ठाकरे यांची तारीख घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची तारीख
घेण्यासाठी महापौर गेले. पण भेटीसाठी उशिरा गेल्याने मुख्यमंत्र्यांनी भेट न घेताच
जानेवारीची तारीख देणार असल्याचा निरोप दिला.
शिवसेनेलाही मुख्यमंत्र्यांना नावापुरतेच बोलावायचे असल्याने निमंत्रण देण्याचा शिष्टाचार केला आणि विकास कामांचा शुभारभ ठरलेल्या 23 डिसेंबर रोजीच होणार असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.. सेनेने भाजपावर कुरघोडी करण्याचाच हा प्रकार होय. गेल्या काही महिन्यांपासून सेना आणि भाजपा युतीचा कारभार शिवळा जोत्यावर सुरू आहे.
नुकतेच मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेट्रो रेल्वे प्रकल्पासह अन्य कामांचा शुभारंभ केला. त्यावर सेनेने बहिष्कार टाकला होता. त्यानंतर सेनेने घेतलेल्या विविध विकास कामांच्या शुभारंभावर भाजपाने बहिष्कार घातला. यानिमित्ताने सेना, भाजपातील धुसफुस चव्हाट्यावर आली. असे असतानाच औरंगाबाद महानगरपालिकेच्या पदाधिकार्यांनी शहरातील शंभर कोटी रुपये खर्च करून 31 रस्त्यांची कामे करावयाची आहेत. तसेच कांचनवाडी येथे कचर्यापासून गॅस निर्मिती प्रकल्प व तेथेच भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे तसेच शहर बसचा शुभारंभ 23 डिसेंबर रोजी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्य सरकारने रस्त्यांसाठी शंभर कोटीचा निधी दिला आहे. त्यामुळे युतीचे नेते कार्यक्रमास उपस्थित राहावे असे वाटत होते. पण मुख्यमंत्र्यांनी महापौरांची भेट नाकारली. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले रिकाम्या हाताने परत आले.